देगलूर. /प्रतिनिधी .
देगलूर तालुक्यातील बेंम्बरा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या बेंम्बरा तांडा येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तांड्यामध्ये पंचवार्षिक मध्ये अद्यापही सिमेंट कॉंक्रीटचे (CC) रस्ते आणि पुरेसे सोलर पथदिवे पोहोचले नसल्याने ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात राठोड उमेश यादव आणि अभिजीत नामदेव भोसले यांच्यासह अनेक तरुणांनी उपसरपंचांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
बेंम्बरा तांड्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी चालणे कठीण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीसी रस्त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. तसेच, तांड्यात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. इतर भागात सोलर दिवे बसवले जात असताना बेंम्बरा तांड्याला मात्र या सुविधेपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तरुणांचा पुढाकार
गावातील विकासकामात तांड्याला समान न्याय मिळावा, या उद्देशाने राठोड उमेश यादव, अभिजीत नामदेव जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. "आम्ही वारंवार सांगूनही आमच्या भागातील खोदून ठेवलेल्या रस्त्यांचे आणि दिव्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. जर लवकरात लवकर हे काम मार्गी लागले नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल," असा इशारा या तरुणांनी दिला आहे.
उपसरपंचांना दिले निवेदन....
या मागणीसाठी तांड्यातील युवकांनी उपसरपंचांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सोपवले. यावेळी तांड्यातील अनेक नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता ग्रामपंचायत प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन तांड्याचा विकास करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ..
प्रतिक्रिया....
"आमच्या तांड्यात रात्रीच्या वेळी अंधार असतो आणि रस्ते खराब असल्याने वृद्धांना व लहान मुलांना त्रास होतो. ग्रामपंचायतीने आमच्याकडे दुर्लक्ष करू नये, हीच आमची विनंती आहे."
— राठोड उमेश यादव / अभिजीत नामदेव भोसले

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या