देगलूर (प्रतिनिधी):
सोशल मीडियावरील बनावट नोकरीच्या जाहिरातीला बळी पडून फसवणूक झालेल्या देगलूर तालुक्यातील एका नागरिकाला मरखेल पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. सायबर चोरट्यांनी लुबाडलेल्या रकमेपैकी ५५,५०० रुपये यशस्वीरीत्या परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
देगलूर तालुक्यातील लोणी येथील रहिवासी श्री. लक्ष्मीकांत जनार्दन चिद्रावार (वय ४६) यांची सोशल मीडियावरील एका नोकरीच्या जाहिरातीद्वारे फसवणूक झाली होती. चोरट्यांनी त्यांना 'जीएसटी' आणि 'टॅक्स' भरण्याच्या नावाखाली तब्बल १ लाख ४० हजार २९९ रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिद्रावार यांनी २७ जानेवारी २०२५ रोजी सायबर क्राईम पोर्टलवर धाव घेत तक्रार नोंदवली.
मरखेल पोलिसांचा 'ॲक्शन मोड'
तक्रार प्राप्त होताच मरखेल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. रवी हुंडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. विलास पवार सर यांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. गुन्ह्यातील रक्कम ज्या खात्यात वळवण्यात आली होती, त्या खात्याला तात्काळ 'होल्ड' (Hold) करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, गोठवलेल्या रकमेपैकी ५५ हजार ५०० रुपये तक्रारदाराच्या खात्यात परत मिळवून दिले.
पोलीस अधीक्षकांकडून कौतुक
मरखेल पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांचे विशेष कौतुक केले आहे.
द पॉवर न्यूज आवाहन:
"नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी लिंक, नोकरीच्या जामिनावर आधारित जाहिराती किंवा संशयास्पद फोन कॉलवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. सतर्क राहणे हाच सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे." — नांदेड पोलीस प्रशासन.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या