मरखेल/देगलूर: देगलूर तालुक्यातील हाणेगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात मरखेल पोलिसांना यश आले आहे. हैद्राबाद येथील जनाननगर भागातून मुलीची सुरक्षित सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री पीडित अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.
हैद्राबादमध्ये शोधमोहीम
तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित मुलगी हैद्राबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत गोसावी यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार व त्यांच्या पथकाने ९ मे २०२६ रोजी हैद्राबादमधील जनाननगर परिसरात शोधमोहीम राबवली. तिथे मुलगी आणि संशयित आरोपी मिळून आले.
आरोपीला अटक
या प्रकरणी शिवकुमार ऊर्फ दावीद वसंत वाघमारे (वय २४, रा. कुमारपल्ली, ता. देगलूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
अत्यंत संवेदनशीलतेने आणि वेगाने या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल मरखेल पोलिसांचे प्रभारी पोलीसनिरीक्षक रवी हुंडेकर साहेब आणि उप पोलीसनिरीक्षक श्री विलास पवार साहेब यांचे परिसरात कौतुक होत आहे..
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या